
पत्नीला तलाक देऊन सौदी अरबमध्ये पळ काढणाऱ्या पतीच्या विरोधात महिलेने तक्रार दाखल केली आहे. मात्र त्या महिलेच्या दिराने तिच्या माहेरी जाऊन तक्रार मागे घेण्यास सांगितले. तसेच तक्रार मागे न घेतल्यास “छपाक” सारख्या दुसऱ्या चित्रपटाची कहाणी लिहिली जाईल, असे म्हणत अॅसिड हल्ल्याची धमकी दिली आहे.
उत्तरप्रदेशातील सुजातगंज येथील एका महिलेचा निकाह मागील वर्षात जुलै महिन्यात बाबूपुरवा येथील राहणाऱ्या नूरजादे याच्यासोबत झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर नूरजादे व त्याचा परिवार महिलेकडे पाच लाखाची मागणी करू लागले. ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही म्हणून सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. या दरम्यान तिच्या पतीने तिला तलाक दिला. तिहेरी तलाक विरोधी कायद्याचा आधार घेत या महिलेने एक महिन्यापूर्वी बाबूपुरवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अटकेच्या भितीने नूरजादे सौदी अरबमध्ये पळाला. तर महिलेचा दिर फैसल याने त्या महिलेच्या माहेरी जाऊन तिला धमकी देण्यास सुरुवात केली.
दोन दिवसांपूर्वी फैसल आपल्या 3-4 मित्रांसोबत महिलेच्या माहेरी धडकला. तक्रार मागे घेण्यासाठी त्याने दबाव टाकला. इतकेच नाही तर महिलेने नकार दिल्यानंतर त्यांनी तिला अॅसिडची बाटली दाखवली आणि इशारा करून बोलला की, ‘छपाक पार्ट 2 बनवून टाकेन’. बाबूपुरवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजीव सिंह यांनी सांगितले की, ‘फैसलला ताब्यात घेण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कार्यरत आहे’.























































