ट्रक, टँकर, कंटेनरचालकांकडून होणारी वसुली भोवली, मुंब्र्यातील 40 वाहतूक पोलिसांच्या होलसेल बदल्या

मिंधे सरकार काळात ठाण्यातील वाहतूक पोलिसांची वसुली मोहीम जोरदार सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. मुंब्रा, शिळफाटा, दिवा, खारेगाव येथे रात्रीच्या अंधारात अवजड वाहनचालकांकडून पैसे गोळा करणाऱ्या वाहतूक विभागातील 40 जणांच्या तडकाफडकी होलसेल बदल्या करण्यात आल्या आहेत. ट्रक, टँकर, कंटेनरचालकांकडून होणाऱ्या वसुलीचा व्हिडीओ हाती लागल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे अॅक्शन मोडवर आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याने वाहतूक पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे वाहतूक शाखेच्या अंतर्गत मुंब्रा येथील वाहतूक नियंत्रण युनिट हादेखील भाग येतो. यामध्ये शिळफाटा, मुंब्रा, खारेगाव, कळवा, तसेच मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि दिवा हे महत्त्वाचे विभाग येत असून या भागात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची रहदारी सुरू असते. दरम्यान अवजड वाहनांना अडवून त्यांच्याकडून वाहतूक शाखेचा एक वॉर्डन जोरदार वसुली करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. वसुली करणारा व्यक्ती काही वेळानंतर पळून गेला. ही व्यक्ती वाहतूक विभागातील वॉर्डन होता का, याचा शोध सुरू करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

वसुलीत सर्वांचा हिस्सा

वसुलीच्या व्हिडीओची दखल आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी घेतली असल्याने वाहतूक उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षकांसह 40 जणांचा सामावेश असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना थेट पोलीस मुख्यालय येथे तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश येईपर्यंत बदली करण्यात आली आहे. दरम्यान या वसुली प्रकरणात सर्वांचाच हिस्सा असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यालयात पाठवले

या व्हिडीओची गंभीर दखल घेत मुंब्रा वाहतूक कक्षाच्या पोलीस निरीक्षकासह 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली मुख्यालयात करण्यात आली आहे. या कारवाईनंतर इतर सर्वच वाहतूक कक्षातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाहतूक पोलीस दलात पहिल्यांदा इतक्या मोठ्याप्रमाणात कारवाई झाल्याचे सांगण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फिल्डिंग

मुंबई एंट्री पॉइंट, घोडबंदर, वागळेसह कळवा, रेतीबंदर, भिवंडी रोडवर ठाणे वाहतूक पोलीस रात्रीची गस्त घालतात. या भागात ड्युटी मिळावी यासाठी अनेक जण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फिल्डिंग लावतात. वाहतूक पोलिसांचे वसुली प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत काय निष्पन्न होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.