एकनाथ मिंधेंविरोधात राज्यभरात संताप

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ‘जय गुजरात’च्या घोषणेमुळे राज्यभरात एकनाथ मिंधेंविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. पुण्यात मनसेने शिंदे यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले.

शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप बाहेर संजय राऊत

अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले आहे. काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल शिवसेना नेते – खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा राजीनामा घ्या हर्षवर्धन सपकाळ

अमित शाह यांचा ‘वफादार’ शिलेदार होण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली. स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, असे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यापुण्यात मनसेचे आंदोलन

ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात असे फलक झळकावत पुण्यातील बालगंधर्व चौकात मनसे कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले.

केम छो शिंदे म्हणायचे का? – जितेंद्र आव्हाड

विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणतात. एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर कसे आहात ऐवजी आता ‘केम छो’ असे विचारायचे का? स्वतःच्या पायावर धोंडा टाकून दुसऱ्याला खूश करणार असेल तर तुम्हाला मुबारक हो, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हा गुजरातच्या वॉशिंग मशीनचा परिणामपटोले

महाराष्ट्राच्या मातृभूमीबद्दल आणि मातृभाषेबद्दल त्यांचे मत काय, हे आता स्पष्ट झाले आहे. हे सर्व जण गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेलेले आहेत. हा गुजरातच्या वॉशिंग मशीनचा परिणाम आहे, असा टोला कॉँग्रेस नेते नाना पटोले यांनी लगावला.