रेल्वेच्या खाजगीकरणाविरोधात सोलापुरात आंदोलन; ‘सिटू’चे 138 कार्यकर्ते ताब्यात

रेल्वेच्या खाजगीकरणाविरोधात सोलापुरात ‘सिटू’ च्या कार्यकर्त्यांनी निर्दशने केली. यावेळी 138 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. केंद्र सरकारने 109 रेल्वेमार्गावर 151 खाजगी रेल्वे गाड्या चालवण्यासाठी देशी-विदेशी खाजगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे. यापूर्वीच सरकारने रेल्वे इंजिन व बोगीचे उत्पादन, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल चे काम व मालवाहतूक मार्ग यामध्ये 100 टक्के परकीय गुंतवणुकीला मुभा दिली आहे. सरकार 400 रेल्वे स्टेशनचे खाजगीकरण करणार आहे. रेल्वेच्या या खाजगीकरणाविरोधात निर्दशने करण्याचे आवाहन सिटूने केले होते.

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) च्यावतीने रेल्वेच्या खाजगीकरणाच्या विरोधात गुरुवारी सोलापूरात निरद्शने करण्यात आली. ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार कॉ. नरसय्या आडम आणि सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्याजवळ सकाळी 11 वाजता निरद्शने करण्यात आली. रेल्वे खाजगीकरण रद्द करा, क व ड वर्गातील 50 टक्के पदे रिक्त करण्याचा निर्णय मागे घ्या, 1 लाख 25 हजार रिक्त पदे तातडीने भरा, प्रतिगामी धोरणे घेणारे मोदी सरकार मुर्दाबाद, रेल्वे मजदूर एकता जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत, निषेधाचे फलक दाखवत तीव्र निदर्शने केली. यावेळी आडम यांनी सरकारच्या या खाजगी धोरणाविरोधात टीका केली. ते म्हणाले की, रेल्वेमधून दरवर्षी सरकारला 2000 अब्ज महसूल मिळतो. सरकारने देशातील करबुडव्या, दिवाळखोर नफेखोर भांडवलदारांना रेल्वेचे खाजगीकरण करून आंदण म्हणून देण्याचा घाट घातला आहे, असा आरोप त्यांनी केला. रेल्वे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. सरकार अंडी विकण्याऐवजी कोंबडीच विकायला निघाले आहे, असा आरोपही त्यांनी केला. सोन्याची अंडी देणाऱ्या रेल्वेचे खाजगीकरण हाणून पाडा, असेही ते म्हणाले.

आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त होता. माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदा बल्ला, गंगुबाई कनकी आदीना पोलिसांनी आंदोलनापुरव्ीच ताब्यात घेतले होते. त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी सिटूच्या 138 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या आंदोलनात कॉ. नलिनी कलबुर्गी, सिद्धप्पा कलशेट्टी, कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. म.हनीफ सातखेड, कॉ. रंगप्पा मरेड्डी आदींसह शेकडो कार्यकर्ते निदर्शनात सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या