कामावरून कमी केल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत दहिवली भागातील एच. पी. कंपनीच्या पेट्रोल पंपावर गेल्या दहा ते वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या तीन कामगारांना अचानक व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकल्याने सर्वच्या सर्व बारा कामगारांनी पेट्रोल पंपासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक न्यायालयाने आदेश देऊनही तीन कामगारांना सेवेत न घेतल्याने न्यायालयाचा अवमान झाला आहे.

गगनगिरी सर्व्हिस सेंटर हा पेट्रोल पंप चालवते. दिलीप नारायण पटेकर हे या पंपाचे प्रोप्रायटर आहेत. पेट्रोल पंपावर काम करीत असलेल्या कामगारांना सुरुवातीला कायद्यानुसार किमान वेतन मिळत नव्हते. ते इंटक या कामगार संघटनेचे सभासद झाले. संघटनेच्या माध्यमातून ४ हजार ८०० रुपये वेतन होते ते १२ हजार ५०० रुपये इतके वाढले मात्र सुरुवातीच्या तीन महिन्यात कामगारांच्या वेतनातून ४ हजार ८०० रुपये वगळून अन्य रक्कम काढून घेतली गेली. कामगारांची बँकेची एटीएम कार्ड पटेकर यांच्याकडे असल्याने त्यांनी परस्पर रक्कम काढून घेतली. याबाबत कामगारांनी विचारणा करून विरोध केला असता त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली गेली. इतकेच नव्हे तर बाहेरून गुंड आणणे व जीवे मारण्याची धमकी देणे इथपर्यंत त्यांची मजल गेली होती. कामगारांनी काही दिवस हे सहन केले. त्यांनतर कर्जत पोलीस ठाणे, तहसीलदार व इतर सरकारी यंत्रणांकडे तक्रारीसुद्धा केल्या आहेत. त्यानंतर पटेकर यांनीच कामगारांच्या विरुद्ध रायगड पोलीस अधीक्षकांकडे कपोलकल्पित खोट्या तक्रारी केल्याचा कामगारांचा आरोप आहे.

कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविल्याने पटेकर यांनी प्रवीण बबन गवळे, मंगेश प्रभाकर चव्हाण आणि संजय नारायण वरघडे यांना नोटीस पाठवून कामावरून काढून टाकले. तीनही कामगारांवर केलेली कारवाई चुकीची आहे. पुढील आदेश होईपर्यंत कामावरून काढून टाकू नये, असा महाराष्ट्र औद्योगिक न्यायालयाचा आदेश असूनही पटेकर यांनी हे पाऊल उचलले आहे. ते बेकायदेशीर आहे. तीनही कामगारांना दिलेली नोटीस त्वरित मागे घ्यावी असे या पंपावर काम करणाऱ्या कामगारांचे म्हणणे आहे. तीनही कामगारांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.