
सामना प्रतिनिधी । लातूर
उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याच्या गैरप्रकारातील दोषी प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गुरूवारी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या लातूर येथील उपकेंद्रासमोर युवा सेनेच्यावतीने ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात आले. विद्यापिठातील परीक्षा विभागातील घोटाळ्यास कुलगुरु पाठीशी घालत असल्याचा आरोप युवसेनेचे सहसचिव तथा सिनेट सदस्य प्रा. सुरज दामरे यांनी केला आहे.
लातूर येथील एम.एस.बिडवे अभियांत्रिकी कॉलेज येथे स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे अधिकृत पेपर तपासणी केंद्र असून या केंद्रावर उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावून मार्कात छेडछाड आणि पुनर्मुल्यांकनामध्ये ठराविक विद्यार्थ्यांचे मार्क वाढविण्यात आल्याची तक्रार युवासेना सहसचिव तथा सिनेट सदस्य प्रा. सुरज दामरे यांनी राज्यपाल आणि कुलगुरू यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन ३ सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीने आपला अहवाल सादर करून महिना उलटून गेला तरी दोषींवर कारवाई केली गेलेली नाही. यावरून कुलगुरू आरोपींना पाठीशी घालत आहेत आणि अशा गैरप्रकारांना जणू त्यांची संमतीच आहे हे ते दाखवून देत आहेत. त्यामुळे युवासेनेच्या वतीने विद्यापीठ उपकेंद्रासमोर युवासेनेने ‘बोंबाबोंब आंदोलन’ केले. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसून ते अधिकच तीव्र होईल. त्यानंतर होणाऱ्या गैरसोयींना पूर्णपणे विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, असे मत प्रा.सुरज दामरे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी युवासेना जिल्हा युवाधिकारी कुलदीप सूर्यवंशी, राहुल मातोळकर, रमण माने, श्रीनिवास नरहरे, सौरभ बुरबुरे, विष्णू तिगिले, आकाश मासाने, स्वप्नील बेंडगे, संतोष माने, रमेश गडगिले, कृष्णा चव्हाण, अमोल सूर्यवंशी, आकाश पाटील, त्र्यंबक स्वामी, तानाजी करपुरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.































































