
निर्धारित वेळेनंतर दुकान बंद करण्यास सांगितल्याने अस्तगाव येथील ग्रामपंचायत कर्मचा-यास शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने राहाता तहसिलदारांना निवेदन देत दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सोमवार पासुन काम बंद आंदोलनाचा इशाराही कर्मचारी संघटनेने दिला आहे.
कर्मचारी संघटनेने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात , देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. पोलीस, डॉक्टर आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही गावपातळीवर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सणवार व शासकीय सुट्टी न घेता काम करत आहोत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व दुकाने दुपारी 4.00 वाजेनंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार तसेच व्यवस्थापन समिती अस्तगांव यांचे आदेशानुसार चोळकेवाडी, अस्तगांव येथील दुकाने बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी विकास भास्कर नळे हे 2 जून रोजी संध्याकाळी 7.30 वा गेले असता दुकानदार नामदेव अंभोरे, संकेत दत्तात्रय अंभोरे, शरद अंभोरे यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच केशव बाजीराव चोळके यांनी कर्मचारी विकास नळे यांस शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली आहे. दुकानदारावर साथ रोग अधिनियम 1897 प्रमाणे कारवाई करावी. तसेच संबंधितावर कारवाई होत नाही, तोपर्यंत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सोमवारपासून काम बंद आंदोलन करणार आहोत अस म्हटले आहे. हे निवेदन तहसील , गटविकास अधिकारी व पोलिस निरिक्षकांना देण्यात आले. निवेदनावर महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष राहूल पोकळे ,उपाध्यक्ष शकिल पठाण , कार्याध्यक्ष मधुकर घोरपडे , सचिव योगेश गोसावी आदींसह कर्मचा-यांच्या सह्या आहेत.



























































