
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच सत्ताधारी महायुतीतच प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. सकाळपर्यंत पडद्यामागे असलेले मतभेद दुपारनंतर उघडपणे समोर आले असून, आरोप–प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय वातावरण तापले आहे. अंतर्गत संघर्ष आता टोकाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भाजप आणि अजित पवार गट यांनी अगोदरच शिंदे गटाला बाजूला ठेवले आहे. नियोजनबद्ध खेळी करत शिंदे गटाला राजकीयदृष्टय़ा वेगळे ठेवले आणि नगरच्या राजकारणाची दिशा तेव्हाच स्पष्ट झाली होती. मात्र, अतिआत्मविश्वास शिंदे गटाच्या अंगलट आला आणि ऐनवेळी त्यांना बाजूला सारण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे महायुतीत मोठा गोंधळ निर्माण झाला.
हे प्रकरण शांत होत नाही, तोच आता भाजपने थेट आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. सत्ताधारी महायुतीत एकत्र असतानाही नगरसेवकांनी एकमेकांवर प्रभागातील विकासकामांवरून बोट दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची पोलखोल सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपच्या एका नगरसेवकाने थेट शिंदे गटावर आरोप केला आहे. स्वतःच्या घरासमोरील रस्त्यांचा विकास झाला, मात्र इतर नागरिकांच्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. मोठय़ा प्रमाणात विकास अपेक्षित असताना केवळ थातूरमातूर कामे करून खोटी आश्वासने दिली गेली, असा थेट आरोप केला आहे. जनतेला फक्त गाजर दाखवून निवडून यायचे आणि नंतर दुर्लक्ष करायचे, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. एकंदरीत नगर शहरात सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे रस्त्यावर आला आहे.
शिंदे गटाने ‘जादूटोणा’ केल्याचा आरोप
निवडणुकीच्या रणधुमाळीत आता प्रचार नव्हे; तर जादूटोणा सुरू झाल्याने अहिल्यानगरचे राजकारण थेट अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलले गेले आहे. प्रभाग 10 मध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयासमोर शिंदे गटाच्या उमेदवाराने जादूटोणा केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. मंगळगड परिसरातील भाजप उमेदवार सागर मुर्तडक यांच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

























































