अहिल्यानगर सर्वाधिक थंड, तापमानाचा पारा घसरला; 6.6 अंश

राज्यात कडाक्याची थंडी सुरू झाली असून, गुरुवारी (दि. 11)  अहिल्यानगरचे किमान तापमान राज्यात सर्वांत कमी 6.6 अंश होते, तर आज (दि. 12) सकाळी किमान तापमान 7.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हे तापमान महाराष्ट्राचे मिनी कश्मीर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षा तब्बल 3 अंशांनी कमी आहे. महाबळेश्वरचे किमान तापमान 9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर हिंदुस्थानातून झोतवारा (हवेच्या वरच्या थरातील थंड वारे) वेगाने महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील किमान तापमानात 5 ते 7 अंशांनी घट झाली आहे. 11 डिसेंबरला राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याने राज्याला हुडहुडी भरली. समुद्रसपाटीपासून दहा ते पंधरा हजार फूट उंचीवर वाऱयाच्या वरच्या थरात गार वारे वेगाने वाहण्यास सुरुवात झाली आहे. ते वारे उत्तर भारतातून महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाली आहे. हे वारे खालच्या थरात आले आहे. त्यामुळे राज्य गारठून पारा 5 अंश सेल्सिअस इतका खाली आला. त्यामुळे 2019 नंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. 12 डिसेंबर रोजी अहिल्यानगर आणि सोलापूर जिह्याच्या सीमेवर असलेल्या जेऊर (ता. करमाळा) येथे राज्यातील सर्वांत कमी 5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

या खालोखाल जळगाव, 6.9 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 7.3, नाशिक 7.8, पुणे 8.3, मालेगाव 8.4, सातारा 9.4, छत्रपती संभाजीनगर 10.6, धाराशिव 10.4, परभणी 10.8, महाबळेश्वर 9 अंश सेल्सिअस असे तापमान नोंदवले गेले आहे.