
अफगाणिस्तानातील 34 पैकी 33 प्रातांवर तालिबानने कब्जा केला आहे. आता फक्त पंजशीर प्रातांवर तालिबानचा कब्जा नाही. त्यामुळे पंजशीर प्रांत ताब्यात घेण्यासाठी तालिबानने हालचाली सुरू केल्या आहेत. तालिबानचे दहशतवादी पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पंजशीरचे शेर म्हणवणाऱ्या अहमद मसूद यांच्याकडून तालिबान्यांना कडवा प्रतिकार करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत पंजशीर तालिबान्यांसमोर झुकणार नाही. त्यांच्याशी संघर्ष करण्यात येईल, अशी भूमिका मसूद यांनी घेतली आहे.
तालिबानला टक्कर देण्यासाठी मसूद आणि अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती घोषित करण्यात आलेले अमरुल्ला सालेह यांनी रणनीती तयार केली आहे. तालिबानने मसूद यांना शरणागती पत्करण्यासाठी चार तासांचा वेळ दिला आहे. मात्र, मसूद यांनी पंजशीर कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही. तालिबानसमोर शरणागती पत्करणार नाही. त्यांच्याशी संघर्ष करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
आम्ही सोवियेत संघाशी लढलो आहोत, आता तालिबान्यांशी लढणार आहोत. मसूद यांचे वडील अहमद शाह मसूदही तालिबान आणि सोवियेत संघविरोधी होते. त्यांनी या दोघांशी मुकाबला केला होता. मात्र, अल कायदाने कट रचून 9/11 च्या हल्ल्यापूर्वी त्यांची हत्या केली होती. आता मसूदही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तालिबान्यांना टक्कर देत आहेत.
मसूद यांना पंजशीरमधील नागरिकांनाही पाठिंबा दिला आहे. तालिबान्यांशी लढणार असून शरणागती पत्करणार नाही, असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. तालिबान्यांशी लढण्यासाठी अनेक भागातील तरुण सीमेवर दाखल होत आहेत. पंजशीर प्रांतात तालिबान्यांचा मुकाबला करण्यासाठी 10 हजाराचे सैन्य तैनात ठेवण्यात आले आहे.
आम्ही पंजशीरला सर्व बाजूंनी घेरले आहे. त्यांनी शरणागती पत्करावी, हाच एक मार्ग त्यांच्यासमोर आहे. आम्ही त्यांनी शरणागती पत्करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यांनी चर्चेला यावे, अन्यथा युद्धासाठी तयार राहवे, असे तालिबानने म्हटले आहे. अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांच्या दहशतीत वाढ झाली आहे. हजारो लोकांची विमानतळावर अजूनही गर्दी होत आहे. असे असतानाही तालिबानला टक्कर देण्याासाठी पंजशीर सज्ज झाला आहे.




























































