
नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी पार पडली. त्यानंतर आज निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह 196 जणांचे उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत. 11 फेबुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
नगर जिल्हा बँकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यासाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांच्या उपस्थितीत बुधवारी झाली. या निवडणुकीसाठी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे, सीताराम गायकर, माजी आमदार शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर घुले, आमदार मोनिका राजळे, बिपीन कोल्हे, नीलेश लंके, उदय शेळके, अण्णासाहेब म्हस्के, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, भानुदास मुरकुटे, वैभव पिचड, रावसाहेब शेळके, आशुतोष काळे, राजेश परजणे, पांडुरंग अभंग, अरुण जगताप, संग्राम जगताप, विठ्ठलराव लंघे, अण्णासाहेब शेलार, अशोक भांगरे यांच्यासह 196 जणांचे उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत.
शेवगाव सेवा सोसायटी मतदारसंघातून चंद्रशेखर घुले व राहाता सेवा सोसायटी मतदारसंघातून अण्णासाहेब म्हस्के या दोघांचे एकमेव अर्ज असल्याचे त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. 12 फेब्रुवारीला चिन्हवाटप होऊन 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दुसऱयाच दिवशी 21 रोजी मतमोजणी आहे.



























































