नगर – प्रशासनाकडून पाणीपुरवठय़ाचे ढिसाळ नियोजन, नगरकरांना निर्जळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुळा धरणात मुबलक पाणी असतानाही मनपा प्रशासनाच्या निक्रियतेमुळे नगर शहर व उपनगरात अनेक वर्षांपासून पाणीप्रश्न गंभीर आहे. वर्षभरातील निम्मे दिवसही नागरिकांना पाणी मिळत नाही. अनेक भागात चार-पाच दिवसांनंतर पाणी येते. मनपाचे पाणीपुरवठय़ाचे बजेट कोटय़वधीचे असूनही शहरात पाण्याची बोंबाबोंब आहे. पाणीपुरवठय़ाचे ढिसाळ नियोजन असल्याने नागरिकांची सध्या भर उन्हात पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

मनपाकडून नगरकरांना ‘फेज-2’चे स्वप्न दाखविले गेले. ‘फेज-2’मुळे नगरचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मनपा प्रशासनाकडून वारंवार सांगितले. मात्र, 12 वर्षांनंतरही ‘फेज-2’ योजना पूर्णत्वास आलेली नाही. ही योजनाच मृगजळ ठरणार अशी चर्चा शहरात सुरू आहे. पाणीपुरवठय़ासाठी 2021-22 मध्ये 29 कोटी 67 लाख रुपयांची जमा तरतूद करण्यात आली होती. चालूवर्षी ही तरतूद वाढवून 71 कोटी 80 लाख 90 हजार केली आहे. असे असतानाही शहरात कायमच पाण्याची बोंबाबोंब आहे. पाणीप्रश्नावर अनेकदा नागरिकांचा मोर्चा मनपावर धडकलेला आहे. मात्र, यातून मनपाच्या पाणीपुरवठय़ात काही सुधारणा झालेली नाही. एखाद्या वसाहतीला पाणी मिळाले की नाही, हे तपासण्यासाठी मनपाकडे यंत्रणाच नाही.

मनपाच्या या कृत्रिम टंचाईला मनपाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. कोणत्या पाण्याच्या टाकीवरून कोणत्या भागाला किती वेळ पाणी दिले जाते, याचा हिशेब कोणाकडे नाही. मुळा धरणातून दररोज मोठय़ा प्रमाणात पाणी उपसा केला जातो. तरीही नगर शहर तहानलेलेच आहे. अनेक कॉलनींना आठ ते दहा दिवसांनंतर पाणी मिळते. जवळपास 75 टक्क्यांहून अधिक शहर तहानलेले असून, नागरिकांना सध्या भर उन्हात पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.