
राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिह्यात ‘अनलॉक’ सुरू झाले असून, जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. तब्बल दोन महिन्यांनंतर नगर जिह्याने मोकळा श्वास घेतला असून, बाजारपेठेसह सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. व्यापाऱयांनी कोरोना नियमांचे पालन करीत सकाळी दुकाने उघडली.
मात्र, खरेदीसाठी नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी केल्यामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. दरम्यान, कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने प्रशासनाकडून धार्मिक स्थळे व शाळा-महाविद्यालये बंदच ठेवण्यात आली आहेत. आजपासून तालुकास्तरावर काही प्रमाणात बससेवाही सुरू झाली आहे.
नगर जिह्यामध्ये अनलॉक जाहीर झाल्यानंतर सकाळपासून व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले. दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर काही प्रमाणामध्ये गर्दीही कमी झाली. जिह्याबाहेर जाणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे आज अनेकांनी खासगी वाहनाने जाणे पसंत केले.
जिह्यात कोरोना सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक असून, त्या अटीवर निर्बंध उठविण्यात आले आहेत. दरम्यान, एप्रिल व मे महिन्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून जिह्यात निर्बंध जारी करण्यात आले होते. शनिवारी व रविवारी पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला होता. दरम्यान, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रशासनाकडून आजपासून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
धोका टळलेला नाही, महापालिका सतर्क राहणार – आयुक्त गोरे
‘ब्रेक दी चेन’ मोहिमेअंतर्गत नगर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाचा धोका अद्यापि टळलेला नसून, प्रतिबंधक नियमांचे पालन व्हावे यासाठी महानगरपालिका प्रशासन सतर्क राहणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करणार असल्याचे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले. ‘ब्रेक दी चेन’ मोहिमेची शहरात प्रभावी अंमलबजाणी केल्यामुळे बाधितांची संख्या नियंत्रणात आली. याबद्दल स्व. रामलालजी ललवाणी मेमोरियल फौंडेशनच्या वतीने आयुक्त शंकर गोरे व महापौर बाबासाहेब वाकळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

























































