
नगर जिल्हा रुग्णालयातील आग दुर्घटनेच्या चौकशीसाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची चौकशी समिती आज नगरमध्ये दाखल झाली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱयांना प्रश्नावली देऊन चौकशी करण्यात येत आहे. सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, महावितरणचे अधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका यांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. संबंधित अधिकाऱयांना नोटिशीसह एक प्रश्नावलीही देण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबरला आग लागली होती. या घटनेत 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. आज सकाळी ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. दिवसभर चौकशीची प्रक्रिया सुरू होती. या घटनेशी संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना चौकशी समितीने नोटिसा पाठविल्या आहेत. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केले आहे.
जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, डॉ. विशाखा शिंदे, स्टाफ नर्स सपना पठारे यांना निलंबित केले आहे. तर, स्टाफ नर्स आस्मा शेख व चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक केली आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांवर चुकीची कारवाई केल्याचा निषेध करून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱयांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
खासगी रुग्णालयांचे बंद आंदोलन
सदर प्रकरणात कोणतीही चौकशी न होता जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱयांवर निलंबन, अटकेची कारवाई करण्यात आली. चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने आज खासगी रुग्णालये बंद ठेवण्याचे आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार जिल्हाभरातील रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग व अन्य विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. या बंदमुळे रुग्णांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली.
सात ते आठ दिवस चौकशी सुरू राहणार – राधाकृष्ण गमे
जिल्हा रुग्णालयातील आग घटनेसंदर्भात आज चौकशी समितीने अपेक्षित विभागाकडून प्राथमिक माहिती घेतली आहे. समितीला अजूनही चौकशी करायची असून, ही चौकशी सात ते आठ दिवस चालणार आहे. आग कशामुळे लागली या निष्कर्षापर्यंत आम्ही आलेलो नाही, अशी स्पष्टोक्ती चौकशी समितीचे अध्यक्ष तथा नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यासंदर्भात यापूर्वी काही अधिकाऱयांनी माहिती घेतलेली आहे. आम्हाला आता बांधकाम विभाग, महावितरण, महापालिका यासह विविध विभागांकडून माहिती घ्यायची आहे. त्या संदर्भामध्ये प्रश्नावली दिली आहे. चौकशी समितीचे कामकाज अजून सात ते आठ दिवस चालणार आहे. अद्याप आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत आलेलो नाही, असेही गमे यांनी सांगितले. दरम्यान, चौकशी समिती माहिती घेत आहे. पोलीस विभागाने केलेल्या कारवाईबद्दल विचारल्यावर गमे यांनी यासंदर्भात मला काही बोलता येणार नाही, असे स्पष्ट केले.




























































