
कापसाचे प्रामुख्याने अधिक क्षेत्र असलेल्या भागात गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडत आहे. काही भागात तीन ते चार वेळा अतिवृष्टी झाली. नद्यांना पूर आल्याने पिके वाहून गेली आहेत. तर, बहुतांश भागात कापसाच्या पिकात पाणी साठून राहिल्याने कापसाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होऊन उत्पादन घटण्याचा शेतकऱयांचा अंदाज आहे. कृषी विभागाकडे नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राची नोंद नसली तरी शेतकऱयांकडून मिळालेल्या माहितीनुसार 50 ते 60 हजार हेक्टर क्षेत्रावरील कापसाच्या पिकाला फटका बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
नगर जिल्ह्यात कापसाचे 1 लाख 14 हजार 352 हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा 1 लाख 1 हजार 819 हेक्टरवर कापसाची लागवड झाली. यंदा दरवर्षीच्या तुलनेत 15 हजार हेक्टर क्षेत्र कमी झाले. मराठवाडा, विदर्भातील मुख्य पीक असलेल्या कापसाचे क्षेत्र नगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत वाढत गेले. मात्र, हे पीक अलीकडच्या काळात सतत अडचणीत येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही अतिवृष्टी, पूर व जास्तीच्या पावसाच्या तडाख्यात कापूस सापडला आहे. अजून कापसाची वेचणी कुठेही सुरू झाली नाही. मात्र, गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडत असल्याने पीक पिवळे पडू लागले आहे.
नगर जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी, नेवासा आणि राहुरी तालुक्यांत सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्याला गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसाचा फटका बसत आहे. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात सलग तीन वेळा अतिवृष्टी झाली. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून 25 हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यापेक्षा अधिक नुकसान झाले. सतत पाणी साठल्याने कापसाची झाडे पिवळी पडत आहेत. शेतकऱयांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाभरात सुमारे 50 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कापसाला फटका बसला आहे. कापसाच्या उत्पादनात थेट घट होणार असल्याचे स्पष्ट झाले. कृषी विभागाने मात्र सध्या तरी केवळ पुराने वाहून गेलेल्या पिकांचेच पंचनामे केले आहेत.
तीन वर्षांपासून कापूस अडचणीत
नगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून कापसाचे पीक सतत अडचणीत येत आहे. सलग गेल्या तीन वर्षांपासून कापूस काढणीच्या काळात पाऊस पडत आहे. गेल्या वर्षी वेचणीच्या काळात परतीचा पाऊस झाल्याने कापसाचे नुकसान झाले. त्याआधीही गेल्या दहा वर्षांत चार वेळा दुष्काळी स्थितीमुळे कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला. यंदाही पाऊस असल्याने कापसाचे पीक अडचणीत असून, आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.
तालुका कापसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
शेवगाव 35,020
पाथर्डी 19,797
नेवासा 16,202
राहुरी 12,518
श्रीगोंदा 4755
श्रीरामपूर 4214
कर्जत 3014
कोपरगाव 2076
राहाता 1357
नगर 1308
संगमनेर 975
जामखेड 556
पारनेर 27





























































