
नगर जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱया कोरोनाबाधितांसमवेत त्यांचे नातेवाईकही थांबत असल्याचा प्रकार उघड झाला होता. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यासह डॉक्टरांनाही रुग्णसेवेत अडचणी येत होत्या. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयात रुग्णांव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत.
नगर जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, कोरोना रुग्णांसह त्यांचे नातेवाईकही रुग्णालयात थांबत होते. रुग्णांसाठी जेवण आणणे, वैद्यकीय कर्मचारी जवळपास नसेल तर स्वतःच रुग्णाचा ऑक्सिजन वाढवणे असे प्रकार होत होते. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टरांना अडचणी येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी मांडले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तत्काळ या ठिकाणी रुग्णांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश न देण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांना या निर्देशाची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आज हे आदेश काढले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज जिल्हा रुग्णालयात भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. रुग्णालयाच्या आवारातील सर्व खासगी वाहने बाहेर काढून रस्त्याच्या कडेला लावण्यात आली; तसेच आवारातील नातेवाईक व अन्य अवांतर गर्दीलाही हटवण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात 24 तास बंदोबस्त
– मुख्य गेटवर स्वतंत्र पोलीस अधिकारी व पाच कर्मचारी नेमण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तसेच रुग्णालयात दोन पोलीस नियुक्त केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी शवविच्छेदन किंवा शव ठेवले होते त्या ठिकाणीसुद्धा पोलीस बंदोबस्त ठेवण्यासह जिल्हा रुग्णालयात 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ज्या स्वयंसेवी संस्थांना रुग्णांच्या नातेवाईकांची भोजन व्यवस्था करायची आहे, त्यांनी परिसरातील शाळा-कॉलेजच्या मैदानामध्ये ही सोय उपलब्ध करून द्यावी, असे आदेशही पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत.
एकच दरवाजा सुरू राहणार
– जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रवेशद्वारच आता सुरू राहील. इतर सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तसेच, जिल्हा रुग्णालयांमध्ये आता कोणत्याही नातेवाईकांना प्रवेश मिळणार नाही. डॉक्टरसह कर्मचाऱयांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था रुग्णालयाबाहेर करण्यात आली आहे. रुग्ण स्वतः घेऊन आलेले वाहन, रुग्णवाहिका आणि दिव्यांग व्यक्तींच्या वाहनांनाच रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नातेवाईकांबरोबर लोकप्रतिनिधी, अधिकारी असले तरी त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
लसीकरणासाठी स्वतंत्र प्रवेश
– जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. त्याची जागा बदलली जाणार असून, ते रुग्णालयाच्या दुसऱया बाजूला नेण्यासह तेथेच त्यांच्या येण्या-जाण्याचा दरवाजा करण्याचे आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी करावी, असे या आदेशात म्हटले आहे.

































































