
नगर महापालिकेच्या कचरा घोटाळ्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फिर्यादी गिरीश जाधव यांनी न्यायालयात मनपा आयुक्तांसह अन्य दोन अधिकाऱयांना नोटिसा बजावून चौकशीला बोलाविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात पुढील सुनावणी 1 जुलै रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महापालिकेत कचरा घोटाळा उजेडात आल्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार या घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर महानगरपालिकेचे प्रभारी घनकचरा विभागाचे प्रमुख किशोर देशमुख यांनी केलेला खुलासा न्यायाला धरून नाही, असे जाधव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यातून एकप्रकारे न्यायालयाचा अवमान झालेला आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला असताना न्यायालयाने देशमुख यांना या संदर्भामध्ये म्हणणे मांडण्यास सांगितले होते. मात्र, आजअखेर महानगरपालिकेच्या वतीने न्यायालयात म्हणणे सादर झाले नाही.
त्यामुळे फिर्यादी जाधव यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे व तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवावे, असा लेखी अर्ज ऍड. अभिजित पुप्पाल यांच्यामार्फत सादर केला. न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी 1 जुलै रोजी ठेवली आहे.



























































