व्यापारी संकुलांच्या दुरुस्तीकडे नगर महापालिकेचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर महानगरपालिकेने स्वतःच्या जागेमध्ये बांधलेल्या स्वमालकीच्या इमारतींसह व्यापारी संकुलांची दैन्यावस्था सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. या वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी मनपाचे मोठय़ा प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. या वास्तूंच्या देखभालीची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या मालकीच्या नगर शहरामध्ये अनेक जागा आहेत. यातील काही जागा मोकळ्या असून, काही जागांवर महापालिकेने व्यापारी संकुलांची उभारणी केली आहे. यातून महापालिकेचे उत्पन्न वाढावे हा हेतू होता. या व्यापारी संकुलांमध्ये महापालिकेच्या कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालये, व्यापाऱयांची दुकाने आहेत. मात्र, सद्यःस्थितीत या संकुलांची मोठी दुरवस्था झाली आहे. देखभालीसाठी या संकुलांमध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. शिवाय रात्रीच्या वेळी या संकुलांमध्ये सुरक्षारक्षकही नसतो. यासह उभारणी झाल्यापासून या संकुलांची रंगरंगोटीही करण्यात आलेली नाही. मोकळ्या जागांमध्ये वीज, पाण्याची सोय नसल्याचेही दिसून येते. या अनेक ठिकाणी वायरी उघडय़ावर आहेत. तर, दिव्यांचीही व्यवस्था नाही. काही ठिकाणचे दिवे चोरीलाही गेले आहेत. यासह नळही तोडून नेले आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने येथे अनेकदा चोरीच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या संकुलांची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाली आहे.

या ठिकाणी अनेक गाळेधारक आहेत. त्यांच्याकडे महापालिकेची कोटय़वधी रुपयांची थकबाकी आहे. त्यावर तोडगा काढला जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. नगर शहरातील मध्यवर्ती असलेल्या चितळे रोड परिसरात असलेली नेहरू मार्केट ही इमारत पडून 12 वर्षे उलटली आहेत. तरीही याठिकाणी कोणतीच इमारत उभी राहिली नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागेला कोटय़वधी रुपयांचा भाव आहे. महापालिकेच्या मालकीची जागा असतानाही, प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केलेले नाहीत. आगामी काळात ही संकुले चांगल्या पद्धतीने तयार केली अथवा त्याची देखभाल दुरुस्ती केली, तर त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढणारच आहे.