नगर महापालिकेचा अर्थसंकल्प लांबणीवर, नगरकरांवरील दरवाढ टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2021-22 या आर्थिक वर्षाच्या मनपाच्या अंदाजपत्रकास अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे यंदाही नगरकरांवरील दरवाढ टळली आहे. मनपा अधिनियमानुसार कर-दरवाढीसाठी 20 फेब्रुवारीपूर्वी अर्थसंकल्पीय सभा होणे आवश्यक आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दरवाढ टळली आहे. दरम्यान, अंदाजपत्रक लांबणीवर पडणार असल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम होणार आहे.

मनपाच्या वित्त विभागाकडून अंदाजपत्रक बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. यासंदर्भातील आढावा घेतला जात आहे. नवे आयुक्त शंकर गोरे हे रुजू झाल्यानंतरच अंदाजपत्रकास अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. अंदाजपत्रकाचा प्रस्ताव अंतिम झाल्यानंतर तो स्थायी समितीसमोर पाठविला जाणार आहे. त्यानंतर स्थायीच्या शिफारशींसह तो महासभेकडे पाठविला जाईल. याला अवधी लागणार असल्याने नगरकरांना अंदाजपत्रकासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. अंदाजपत्रक लांबणीवर पडणार असल्याने त्याचा शहरातील विकासकामांवर परिणाम होणार आहे.

गेल्या वर्षी शहरासह जिह्यात कोरोनाचे संकट होते. त्यामुळे मनपाचा अर्थसंकल्प थेट ऑक्टोबरमध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी मनपा प्रशासनाने 715 कोटी 51 लाखांचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले होते. त्यास महासभेने वाढीव तरतुदींसह मंजुरी दिली होती. त्यामध्ये महापौरांसह पदाधिकाऱयांसाठी 5 कोटी 15 लाखांच्या विकास निधीची तरतूद केली होती. मनपाने सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 757 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामुळे यंदाचे अंदाजपत्रक हे किती असणार, याकडे लक्ष लागले आहे.