
नगर महापालिका प्रशासनाने मालमत्ताकरात तीनपटीने वाढ करण्याचा घाट घातला आहे. याबाबतच प्रस्ताव मनपा आयुक्तांनी महासभेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. दरम्यान, कोरोनामुळे नागरिक आधीच मोठय़ा आर्थिक संकटात आहेत. अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले असून, अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने मालमत्ताकरामध्ये थेट तीनपट वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
अनेक वर्षांपासून महापालिकेने मालमत्ताकरासह पाणीपट्टीत वाढ केलेली नाही. शहरात नागरिकांना रस्ते, पाणी व पथदिवे या मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरलेली आहे. यापूर्वी अनेकदा करवाढीचे प्रस्ताव नगरसेवकांनीच पुढाकार घेऊन फेटाळलेले आहेत. आता आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांनी पुढाकार घेऊन महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ताकरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या कोरोनाचा काळ सुरू असून, मागील काळात लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रे अडचणीत सापडलेली आहेत. अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. सामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलेले आहे. त्यात आता महापालिकेने नागरिकांवर आणखी बोजा टाकण्याची तयारी सुरू केली आहे. यावरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

























































