लसीकरण प्रश्नांवर आयुक्त, महापौर झाले निरुत्तर, नगर मनपाच्या महासभेत वादावादी, नाले-गटारीची सफाईही ‘गाजली’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात आतापर्यंत किती नागरिकांचे लसीकरण झाले, लसीकरणाच्या किती व्हायल आल्या, लसीकरणात राजकीय हस्तक्षेप होतो काय, 45 वयोगटापुढे लसीकरणाचा नियम असला तरी तो पाळला जातो का, अशा नगरसेवकांनी केलेल्या प्रश्नांवर महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त शंकर गोरे निरुत्तर झाले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी दोघांना धारेवर धरताना लसीकरणात झालेल्या गोंधळाचे पुरावेच मांडले. मात्र, चर्चा अंगलट येण्याची चिन्हे दिसताच आयुक्तांनी आकडेवारी दिली व महापौरांनी तातडीने दुसरा विषय घेतल्याने लसीकरणाची चर्चा बारगळली.

विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या महापौरपदाची मुदत महिनाखेरीस संपत आहे. या पार्श्वभूमीवर निरोपाची नाही; पण शेवटच्या काळातील महासभा शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने झाली. या सभेत लसीकरणावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर, आयुक्तांना धारेवर धरले.

लसीकरणासाठी किती व्हायल महापालिकेला उपलब्ध झाल्या, याची माहिती दोघेही देऊ शकले नाहीत. 18 ते 45 वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले; तरीही त्यांचे मनपाच्या केंद्रावर लसीकरण केले जात असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. शिवसेना नगरसेवक अनिल शिंदे यांनी शहरात कोणत्या केंद्रावर किती लसीकरण झाले, याची माहिती आयुक्तांकडे मागितली. मात्र, आकडेवारी देण्यासाठी आयुक्तांनी वेळ मागून घेतला. मनपाला लसीकरणाच्या किती मात्रा उपलब्ध झाल्या याची माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी नंतर सांगितले. सरकारने 18 ते 45 वयोगटातील लसीकरण बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या तरी मनपा केंद्रात त्यांचे लसीकरण केले जाते. यामुळे 45 ते 60 वयोगटातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. आवश्यकता भासल्यास आपण त्याचे पुरावेही देऊ शकतो, असे आव्हान त्यांनी दिले. राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनीही त्याला दुजोरा देत वयोवृद्धांवर अन्याय होत असल्याचे सांगितले. आरोग्य कर्मचाऱयांच्या नावाखाली इतरांचे लसीकरण केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्यावर लसीच्या कमी मात्रा उपलब्ध होतात, असे समर्थन आयुक्तांनी केले. मात्र, डॉ. बोरुडे यांनी उपलब्ध मात्रामध्येच योग्य नियोजन व्हायला हवे, याकडे लक्ष वेधले.

शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी केली. लसीकरणात नगरसेवक हस्तक्षेप करतात, लसीकरण सरकारी ठिकाणीच करा, नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना लसीकरण केले जाते. मात्र, सामान्य नागरिक वंचित राहत आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, केंद्रांवर झालेल्या लसीकरणाची आकडेवारी नगरसेवकांना अखेरपर्यंत मिळालीच नाही. त्यामुळे महापौर वाकळे यांनी चर्चा आटोपती घेत आयुक्त गोरे यांची यातून सुटका केली.

नगरसेवक शिंदे-वाकळेंमध्ये वाद

लसीकरण चर्चेवेळी महापौर वाकळे व नगरसेवक शिंदे यांच्यात वाद झाला. समाजवादी पक्षाचे नगरसेवक असिफ सुलतान यांनी लसीकरणातील गोंधळाची माहिती सांगण्यास सुरुवात केल्यावर महापौरांनी त्यांना ‘तुम्ही मध्ये बोलू नका’, असे सांगून खाली बसण्यास सांगितले. त्याला शिंदे यांनी आक्षेप घेत त्यांना बोलू देण्याची मागणी केली. त्यावरून महापौरांनी ‘महासभेत कोणाला बोलू द्यायचे हा अधिकार माझा आहे, तुम्ही सांगू नका’, असे शिंदे यांना सुनावले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

नाले-गटारी सफाई गाजली

n पावसाळ्यापूर्वीच शहरातील नाले व गटारी सफाईचा विषयही गाजला. स्थायी सभापती अविनाश घुले व प्रकाश भागानगरे यांच्यासह नगरसेवकांनी या विषयावर प्रशासनाला धारेवर धरले. नाले-गटारी साफ करून गाळ रस्त्यावर टाकला जातो. तो पुन्हा त्याच नाले व गटारांमध्ये जातो. यातून मनपाचा खर्च वाया जातो. तसेच, रस्त्यांवर गाळ असल्याने रस्ते निसरडे होऊन अपघात होतात. ‘गाळ काढण्याचे काम दिले आहे व गाळ उचलण्याचे नाही’, असे सांगून ठेकदार हात झटकतो, असा दावा नगरसेवकांनी केला. त्यावर शहर अभियंता सुरेश इथापे यांनी त्याची दखल घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर महापौर वाकळे यांनीही नालेसफाईच्या कामाला उशीर झाल्याचे मान्य करून हे काम जानेवारी-फेब्रुवारीमध्येच व्हायला हवे होते, असे स्पष्ट करीत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.