कार्य शिवसेनेचे; मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना रोख मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

पाथरी तालुक्यातील तुरा येथील मुंजभाऊ दादाराव चाळक यांचे सात-बारा उताऱ्यावरील नाव अचानक वगळल्याने त्याचा तीव्र झटका बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची आज शिवसेनेचे तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी भेट घेवून सांत्वन केले. तसेच या कुटुंबीयाला रोख २५ हजार रुपयांची मदतही केली.

पाथरी तालुक्यातील तुरा येथील मुंजभाऊ चाळक यांचा २३ जुलै रोजी तलाठी सज्जाच्या कार्यालयात दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्यांना विमा भरायचा होता. घरची आर्थिक स्थिती हालाखिची असल्याने घरातील गहू विक्री करून त्यांनी विम्याचे पैसे जमविले होते. परंतु तलाठ्याने सातबाऱ्यावर नाव नाही, असे कारण सांगून सातबारा देण्यास नकार दिल्यामुळे मुंजाभाऊ चाळक यांना त्याच ठिकाणी ह्दयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्या मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे आज शिवसेनेचे तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सांत्वन केले. तसेच रोख २५ हजार रुपयांची मदतही दिली. स्थानिक पातळीवर अनेकजण रिकाम्या हाताने सांत्वनासाठी आले आणि निघून गेले. परंतु शिवसेनेचे सतीश घाटगे यांनी ऐनवेळी येवून केलेली मदत मोलाची ठरते. यावेळी त्यांच्या सोबत जि.प. सदस्य रंगनाथ वाकणकर, शिवराज नखाते, शेतकी अधिकारी अमोल तौर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सतीश घाटगे यांनी पाथरी तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष ऊस उत्पादकांच्या गावांना भेटी दिल्या. त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना यंदा चांगला भाव मिळाला असून पेमेंटही वेळेवर मिळाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे आणि शिवसेनेचे बाळकडू बालपणापासूनच प्राशन केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लवकरच पाथरी तालुक्यात एका नव्या साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवणार असल्याचेही सतीश घाटगे यांनी सांगीतले.