Air India Plane Crash- अहमदाबाद विमान अपघातात मोठा खुलासा, विमानाचे एक इंजिन फक्त तीन महिन्यांपूर्वीच बदलले

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच, फ्लाइट क्रमांक एआय 171 मेघानी नगरमधील एका वैद्यकीय वसतिगृहाच्या इमारतीवर आदळले. 241 प्रवाशांसह सुमारे 290  जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातात हिंदुस्थानी वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे एकमेव बचावले आहेत.

अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानाबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. 12 वर्षे जुन्या विमानाच्या उजव्या बाजूचे इंजिन नुकतेच दुरुस्ती करण्यात आले होते. तीन महिन्यांपूर्वी मार्च 2025 मध्ये ते बदलण्यात आले होते. अहमदाबादहून लंडनला जाणारे हे विमान टेकऑफनंतर काही सेकंदातच क्रॅश झाले आणि त्यात 12 क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. या अपघातात एका प्रवाशाशिवाय सर्व 241 जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया विमानाची देखभालीची सविस्तर तपासणी जून 2023 मध्येही करण्यात आली होती. तसेच या वर्षी डिसेंबरमध्ये पुढील तपासणी नियोजित करण्यात आली होती. एप्रिलमध्ये एअर इंडियाने बोईंग 787-8 ड्रीमलाइनरसाठी विमा संरक्षण 750 कोटीवरून 850 कोटी रुपये केले.

एअर इंडियाचे विमान जमिनीवर पडताच मोठा स्फोट झाला आणि भयानक आग लागली. अपघातानंतर विमानाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढलेले मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले होते. त्यामुळे डीएनए मॅचिंगनंतर त्यांची ओळख पटवली जात आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनाही या अपघातात आपला जीव गमवावा लागला.

अहमदाबाद अपघातानंतर, डीजीसीएने एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर विमानासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे.  तसेच अशा विमानांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे.

एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एअर इंडिया सुरक्षा चौकशी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. बोईंग 787 फ्लीटवर ही चौकशी केली जात आहे. एअर इंडियाने त्यांच्या नऊ बोईंग 787  विमानांवर अशा तपासणी पूर्ण केल्या आहेत. उर्वरित 24 विमानांसाठी डीजीसीएने दिलेल्या वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.