
चेन्नईहून कोलंबोला चाललेल्या एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक बसली. वैमानिकाला पक्ष्याच्या धडकेचा संशय येताच त्याने पुरेपूर खबरदारी घेत विमानाचे कोलंबो विमानतळावर सुरक्षित लॅण्डिंग केले. त्यानंतर तेथील सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी केली. विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमानाची कोलंबो-चेन्नई ही रिटर्न फेरी रद्द करण्यात आली. प्रवाशांना पर्यायी विमानाने चेन्नईला पाठवण्यात आले.
एअर इंडियाचे AI273 हे विमान 158 प्रवाशांना घेऊन चेन्नईहून कोलंबोला रवाना झाले होते. विमान हवेत असताना पक्ष्याची धडक बसल्याचा संशय वैमानिकाला आला होता. विमान कोलंबो विमानतळावर उतरल्यानंतर क्रू मेंबर्सने सुरक्षा यंत्रणांना त्याबाबत माहिती दिली. त्यानुसार कोलंबो विमानतळावर विमानाची तपासणी करण्यात आली. अभियंत्यांनी विमानाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र काही काळ ते विमान कोलंबोच्याच विमानतळावर उभे करुन ठेवण्यात आले. यादरम्यान चेन्नईला येणाऱ्या 137 प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून निर्धारित वेळेपत्रकानुसार पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.