नोकरी सोडताय… प्रशिक्षणाचा खर्च, पगार परत द्या, इंजिनीअर्सना एअर इंडियाचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
air-india

आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या एअर इंडियाने नोकरी सोडणाऱया आपल्या इंजिनीअर्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. काही इंजिनीअर्स प्रशिक्षण घेतल्यानंतर लगेचच एअरलाईन्सला रामराम ठोकत आहेत. या इंजिनीअर्सकडून प्रशिक्षणाचा खर्च तसेच प्रशिक्षणाच्या काळात घेतलेला पगार एअरलाईन्सने परत मागितला आहे.

एअर इंडियाचे चाक आर्थिक संकटात रुतले असतानाच वैमानिकांबरोबरच एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअर्स या एअरलाईन्सची साथ सोडत आहेत. विमान उड्डाणादरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास ती दूर करण्याचे काम या इंजिनीअर्सचे आहे. यातील काही इंजिनीअर्स हे प्रशिक्षण घेतल्यानंतर लगेचच नोकरी सोडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी एअर इंडियाने नवीन नियमावली बनवली आहे. एअरलाईन्सचे वरिष्ठ अधिकारी प्रसंता पॉल यांनी यासंदर्भातील कारवाईचा आदेश जारी केला आहे.

एअरलाईन्सने आदेशात नेमके काय म्हटलेय?
गेल्या काही महिन्यांत एअरलाईन्सचे कायमस्वरूपी तसेच कंत्राटी इंजिनीअर्स नोकरी सोडत आहेत. प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि कराराचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ते एअरलाईन्समधून बाहेर पडत आहेत. अशा स्थितीत त्यांनी प्रशिक्षण आणि हॉस्टेलचा खर्च तसेच टीए-डीए व प्रशिक्षण कालावधीत घेतलेला पगार कंपनीला परत द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.

– पगार वेळेवर मिळत नसल्याच्या कारणावरून एअर इंडियाच्या 65 वैमानिकांनी राजीनामा दिला आहे. ते सध्या सहा महिन्यांच्या ‘नोटिस पीरियड’वर आहेत.