
एअर इंडियावर प्रचंड कर्ज असतानाच दुसरीकडे सरकारी विभागांनीच या सरकारी विमान कंपनीची कोट्यवधी रुपयांची उधारीही थकवली आहे. त्यामुळे यापुढे उधारी न देण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. ज्या सरकारी अधिकाऱ्याकडे दहा लाख रुपयांपेक्षा जास्त उधारी बाकी आहे त्यांना यापुढे एअर इंडिया तिकीट देणार नाही.
एअर इंडियाकडून विविध सरकारी संस्थांनी 268 कोटी रुपयांची तिकिटे उधारीने घेतली आहेत ते पैसे अद्याप दिलेले नाहीत. त्यात सीबीआय, आयबी, ईडी, कस्टम आयुक्त, सेंट्रल लेबर इन्स्टिटय़ूट, इंडियन ऑडिट बोर्ड, कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाऊंटस् आणि सीमा सुरक्षा दलाचा समावेश आहे. सरकारी संस्थांना अधिकृत दौऱयासाठी एअर इंडियाच्या विमानानेच प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. एअर इंडियाची तिकिटे उपलब्ध नसतील तरच त्यांना खासगी विमान कंपन्यांची सेवा घेण्याची परवानगी आहे.
सरकारी संस्थांकडे किती थकबाकी आहे त्याचा आढावा घेण्यास एअर इंडियाने गेल्या महिन्यापासूनच सुरुवात केली होती. ज्या विभागाकडे दहा लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे त्यांना उधारीने तिकिटे देणे बंद करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. फक्त विमानतळ प्राधिकरण, नागरी उड्डाण मंत्रालय आणि लोकसभेला त्यातून मुभा देण्यात आली आहे.
थकबाकी वसुलीची मोहीम
थकबाकीदारांची यादी बनवून त्यांच्याकडून वसुलीसाठी एअर इंडियाने कंबर कसली आहे. गेल्या काही आठवडय़ांत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त वसुली करण्यात आली आहे. थकबाकी वसुलीसाठी सक्ती करता येत नसल्याने पैसे मिळण्यास विलंबच लागत असल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
अशी आहे थकबाकी
- कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाऊंटस्, मुंबई – 5.4 कोटी रुपये
- बोर्ड ऑफ रेडिएशन ऍण्ड आयसोटोप – 2.4 कोटी रुपये
- लोकसभा एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एमएसए – 2.2 कोटी रुपये
- सीबीआय – 95 लाख रुपये
- ईडी – 12.8 लाख रुपये
- मध्य रेल्वे – 36 लाख रुपये
- पश्चिम रेल्वे – 4.8 लाख रुपये
- कामगार आयुक्त – 55 लाख रुपये






























































