विमानतळावर 35 लाख 85 हजारांचे सोने जप्त, हवाई गुप्तचर विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हवाई गुप्तचर विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 35 लाख 85 हजार रुपयांचे सोने जप्त केले असून सोने तस्करीप्रकरणी दोन महिलांचे सीमा शुल्क कायद्याखाली जबाब नोंदवून घेतले. विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी हवाई गुप्तचर विभागाचे अधिकारी घेत असतात.

रविवारी हवाई गुप्तचर विभागाचे अधिकारी गस्तीवर असताना एक महिला प्रवासी दुबईहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. तिची झडती घेतली असता तिच्याकडून सहा क्रूड गोल्डच्या बांगड्या आणि एक गोल्ड बार जप्त केला. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 11 लाख 75 हजार 802 रुपये इतकी आहे. तिने गोल्ड बार हा बुटात लपवला होता. तर दुसऱ्या कारवाईत एका महिलेची एआययूच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता तिच्याकडून 24 लाख 9 हजार 526 रुपयांचे सोने जप्त केले. हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या दोघींचा सीमा शुल्क कायद्याखाली जबाब नोंदवून घेतला असून सोने जप्त केले.