
‘बॅग भरो… निकल पडो’ म्हणत जर तुम्ही खचाखच बॅग भरून विमान प्रवासाला निघणार असाल तर तुम्हाला तिकिटामध्ये सूट मिळणार नाही. विमान प्रवाशाच्या हातात बॅग नसेल किंवा हलकी बॅग असेल तर तिकिटात सूट देण्याचा निर्णय नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. देशांतर्गत विमान प्रवासात ही सूट मिळेल. डीजीसीएने यासंदर्भात देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमान पंपन्यांना एक परिपत्रकच काढले आहे.
तिकिटांच्या दरातील या सूटचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना तिकिटाचे बुपिंग करतेवेळीच प्रवासात सोबत बॅग नेणार की नाही हे कळवावे लागणार आहे. जे प्रवासी बॅग न घेताच प्रवास करणार असतील किंवा केवळ केबिन बॅग सोबत ठेवणार असतील त्यांनाच ही सूट मिळणार आहे. केबिन बॅगचे वजन निर्धारित वजनापेक्षा अधिक असता कामा नये. दरम्यान, तिकीट दरामध्ये किती सूट मिळेल तसेच नवीन नियम कधीपासून लागू होईल, याबाबत मात्र डीजीसीएने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. सध्या एक प्रवासी 7 किलो वजनाची केबिन बॅग आणि 15 किलो वजनाची चेक-इन बॅग घेऊन जाऊ शकतो. बॅगेचे वजन अधिक असेल तर प्रवाशाला स्वतंत्र शुल्क म्हणून जादा पैसे मोजावे लागतात.
मूळ भाडय़ापासून हे शुल्क अलिप्त होणार
- प्रवाशांना हवी ती सीट मिळवण्यासाठी शुल्क
- पाणी सोडून खाद्यपदार्थ आणि शीतपेयांसाठी शुल्क
- एअरलाइन लाऊंजचा वापर करण्याचे शुल्क
- स्पोर्ट्स इक्विपमेंट शुल्क
- महागडय़ा बॅगसाठी विशेष शुल्क
- म्युझिकल इन्स्टमेंट व चेक -इन बॅगेजचे शुल्क
यापुढे मूळ भाडे स्वस्त होणार
तिकीट दरांसंबंधी मिळालेल्या फिडबॅकच्या आधारे डीजीसीएने विमान प्रवाशांना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिटामध्ये प्रवाशांना आवश्यक नसलेल्या सेवांचा समावेश असतो. या सेवा व त्यांचे शुल्क स्वतंत्र केल्यास मूळ भाडे स्वस्त होणार आहे. प्रवाशांना त्यांच्या इच्छेनुसार सुविधांची निवड करण्याचा पर्याय असेल.
विमान पंपन्यांना ‘बॅगेज पॉलिसी’अंतर्गत कसलेही सामान जवळ न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फ्री बॅगेज ऑफर द्यावी लागेल. प्रवासी आपल्या सोयीनुसार मूळ भाडय़ासोबत काही सुविधांचा लाभ घेऊ शकतील.