
मुंबईसह दिल्ली, पुणे आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांमधील हवेच्या गुणवत्तेचे पूर्वानुमान देणाऱया ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी ऍण्ड वेदर फोरकास्टिंग ऍण्ड रिसर्च’च्या (सफर) या स्वदेशी मॉडेलला आता जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे.
शहरातील कोणत्या भागात हवेचा दर्जा चांगला आणि कोणत्या भागात हवेत सर्वाधिक प्रदूषण आहे याचे पूर्वानुमान सफरमुळे सहजपणे मिळते. त्याचा उपयोग हवामान खात्यापासून वैद्यकीय क्षेत्र तसेच पर्यटन, शेती, उद्योग क्षेत्रालाही फायदा होत आहे.
सफरच्या मॉडेलचे निष्कर्ष, निरीक्षणे असलेला शोधनिबंध एल्सेविअर जर्नल- ‘एन्व्हॉयरन्मेंटल मॉडेलिंग ऍण्ड सॉफ्टवेअर’ या आंतरराष्ट्रीय पीअर-रिह्यू जर्नलमध्ये दोन दिवसांपूर्वीच प्रकाशित झाला. ‘इंडियाज मेडन एअर क्वालिटी फोरकास्टिंग फॉर मेगासिटीज ऑफ डायव्हर्जंट एन्व्हॉयरन्मेंट्स – द सफर प्रोजेक्ट’ या शीर्षकाखाली हा शोधनिबंध असून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटरोलॉजी (आयआयटीएम, पुणे) या संस्थेच्या नेतृत्वाखाली केंद्रीय हवामान विभाग आणि भुवनेश्वरमधील उत्कल युनिव्हर्सिटीसोबत मांडण्यात आला. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने नागरिक आणि संशोधकांसाठी तयार केलेली सफरची हवा गुणवत्ता पूर्वानुमान यंत्रणा सध्या चार शहरांत कार्यरत आहे.
उपाय सुचवणारे मॉडेल
पूर्वानुमानाचे मॉडेल हे हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने एकत्रित उपाययोजना देणारी यंत्रणा आहे. तसेच हे मॉडेल प्रदूषणाचे धोके कमी करण्यासाठी उपाय सुचविणारे असून स्थानिक पातळीवरदेखील स्वच्छ हवा आराखडा करण्यास मदत करते, असे सफरचे संस्थापक प्रकल्प संचालक डॉ. गुरफान बेग सांगतात.
आरोग्यविषयक सल्ला
सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पूर्वानुमानाची ही यंत्रणा वापरली तर ‘वाईट हवे’च्या दिवसांमध्ये आरोग्यविषयक सल्ला सार्वजनिक स्तरावर योग्य वेळी देता येईल. जेणेकरून हवा प्रदूषणामुळे होणाऱया आरोग्याच्या परिणामांपासून संवेदनशील घटकांना वाचविता येईल, असे सफरच्या वतीने सांगण्यात येते.
उत्सर्जनात मुंबई आघाडीवर
इंधन वापराची अनियंत्रित पद्धत मुंबईतील अतिशय दाटीवाटीच्या झोपडपट्टीमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येते. जैवइंधनामुळे उत्सर्जनाचे सर्वाधिक प्रमाण मुंबईत 15.5 टक्के, खालोखाल 11.4 टक्के पुणे, अहमदाबाद 10.2 टक्के आणि दिल्लीत 3 टक्के इतके आहे.
पुण्यात औद्योगिक उत्सर्जन’
उद्योगधंद्यांमुळे होणारे उत्सर्जन हे पुण्यात सर्वाधिक 21.6 टक्के असून त्याखालोखाल अहमदाबाद 18.8 टक्के, दिल्ली 18.6 टक्के आणि मुंबई 31.1 टक्के इतके आहे.





























































