विमानतळाच्या धर्तीवर लोकमान्य टिळक टर्मिनसचा विकास होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या जागेचा ‘पीपीपी’ तत्त्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे स्टेशन रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात ‘आयआरएसडीसी’मार्फत हे काम केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी पाच हजार कोटींचा खर्च येणार आहे. या टर्मिनसचा 25 एकर जागेवर पुनर्विकास केला जाणार आहे.

कुर्ला टर्मिनसवर बहुमजली कार पार्किंगसह सर्व सुविधा असलेल्या आठ इमारती बांधल्या जाणार आहेत. मेल-एक्प्रेससाठी सध्या असलेल्या पाच फलाटांच्या शेजारी आणखीन तीन नवे फलाट बांधल्यामुळे एकूण फलाटांची संख्या आठ होणार आहे. दोन नव्या टर्मिनस इमारती बांधण्यात येणार आहेत. या टर्मिनसला कुर्ला आणि विद्याविहार स्थानके आणि सांताक्रुझ-कुर्ला लिंक रोडला जोडण्यासाठी रस्ते, पादचारी पूल आणि स्कायवॉक बांधले जाणार आहेत.

कर्मचाऱ्यांसाठी 600 फ्लॅट
कुर्ला पूर्वेतील क्रांतिनगर व साबळे नगरातील 6576 चौरस मीटरवर पसरलेल्या रेल्वे वसाहती आणि झोपडय़ांचे येथून काही अंतरावर 7072 चौरस मीटर जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. येथे कर्मचाऱयांसाठी 600 फ्लॅट बांधले जाणार आहेत. रिकाम्या झालेल्या जागेवर आठ इमारती बांधण्यात येणार आहेत. यात कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोन्ही इमारतींचा समावेश असेल. विमानतळाच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱया या इमारतीमधून मेट्रोचा मार्ग जाणार आहे. तळमजल्यावर वाहनांसाठी पार्किंग असून रेल्वे प्रवाशांसाठीचे 30 बेडचे विश्रामगृह, हॉटेल फूड कोर्ट आदी सुविधांची येथे रेलचेल असणार आहे.

प्लॅटफॉर्मची एकूण संख्या आठ होणार
कुर्ला टर्मिनसवर असलेल्या मोठय़ा प्रमाणावरील झोपडय़ांचे तसेच रेल्वे वसाहतींचा पुनर्विकास करण्याची योजना आहे. ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर मेल-एक्प्रेसची संख्या दहाने वाढणार आहे. 1991 साली बांधलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून देशाच्या विविध भागांत 35 मेल-एक्स्प्रेस सोडल्या जातात. त्याद्वारे एक लाख प्रवासी प्रवास करीत असतात. येथे दररोज नऊ हजार प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होते. सध्या येथे पाच प्लॅटफॉर्म, प्रत्येकी आठ पिट लाइन आणि स्टॅबलिंग लाइन आहेत.