
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याची प्रमुख भूमिका असणारा ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटामध्ये अजयने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अजय देवगन याने देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आगडोंबवरही मौन सोडले आहे. देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आम्ही मनमोकळेपणाने बोलू शकत नाही, असे विधान अजयने केले आहे.
अजय देवगन याने ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, देशभरात असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर आम्ही मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. आम्ही एखाद्या मुद्द्यावर आमचे मत व्यक्त केल्यास कोणाला न कोणाला वाईट वाटतेच. जर आम्ही अधिक काही बोललो तर लोक तान्हाजी या चित्रपटावरही बंदी घालू शकतात. यामुळे चित्रपट निर्मात्याचे प्रचंड नुकसान होईल.
तान्हाजी हा चित्रपट मीच प्रोड्यूस करत आहे, त्यामुळे मला आणि या चित्रपटाशी जोडल्य़ा गेलेल्या कोणत्याही सहकलाकाराला अथवा टीम मेंबरला हे व्हावे असे वाटणार नाही. तसेच तान्हाजीतील अभिनेता सैफ अली खान जरी यावर काही बोलला तरी लोक त्याच्याविरुद्ध आंदोलन सुरू करतील. त्यामुळे मोजून-मापूनच आणि सारासार विचार करूनच बोलावे लागते, असेही अजय म्हणाला.
दरम्यान, ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी, 2020 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगनसह काजोल, सैफ अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मराठी अभिनेता शरद केळकर याने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.






























































