
कुठलीही व्यापारपेठ पाडायला अक्कल लागत नाही, तर ती उभी करायला अक्कल लागते, अशा शब्दांत विरोधकांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. विशेष म्हणजे ह्या सभेत असलेल्या जनसमुदायातील माधव अशोक गायकवाड याने आरक्षण वर्गीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करा, अशा घोषणा देत व प्रश्न करून अजित पवारांची भंबेरी उडविली. यामुळे काही वेळ सभेत गोंधळ उडाला.
कंधार व लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी कंधार येथील शिवाजी चौकामध्ये ना. अजित पवार यांची सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या ठिकाणी जनसमुदायातील माधव अशोक गायकवाड (उमरी) हे पवारांचे भाषण सुरू असताना उभे राहिले व अजित पवारांना आरक्षणाचे वर्गीकरण कधी करणार, असा सवाल केल्याने पवारांची भंबेरी उडाली. नेहमीप्रमाणे विरोधकांचे कारस्थान असे म्हणत मीडियावर भडकले. कॅमेर्यावाल्यांचे कॅमेरे तिकडेच वळतात अन् अजित पवारांच्या सभेत गोंधळ अशी चर्चा सुरू करतात, असेही ते बोलले. पोलिसांनी सदर व्यक्तीस उचलून पोलीस ठाण्यात नेले. दुपारी एक वाजताची वेळ सभेसाठी दिली होती, परंतु अडीच वाजता अजित पवार सभास्थळी आले. यावेळी अजित पवार यांनी कंधार शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांचा उल्लेख करत कंधार शहर हे चहुबाजूने राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचे आश्वासन देत प्रसंगी केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.



























































