उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणांचे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यावरील कोरोना संकटाचा सामना करताना सर्वांची एकजूट आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. लंडन येथील डॉ. अरविंद शाह तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या वतीने राज्यातील कोविड रुग्णालयांना देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांमुळे राज्याच्या कोरोनाविरोधी लढय़ाला ताकद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

डॉ. अरविंद शाह तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या वतीने कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात येणाऱया व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. सामाजिक संस्थांकडून रुग्णांसाठी पाठविण्यात येणारी मदत कोरोनाविरोधी लढय़ाला अधिक ताकद देणारी आहे. ही वैद्यकीय मदत रुग्णांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची काळजी घ्यावी, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या. तसेच लंडन येथील डॉ. अरविंद शाह यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधून त्यांचे आभार मानले, अभिनंदन केले.

या रुग्णालयांना मदत

नगर जिह्यातील अकोले येथील ग्रामीण रुग्णालय, संगमनेर तालुक्यातील एकलव्य आदिवासी संस्थेचे अश्विन ग्रामीण आयुर्वेदिक रुग्णालय, मांची हिल तसेच जीवदया मंडळ, संगमनेर नगर परिषद कॉटेज हॉस्पिटल, पुण्याचे ससून रुग्णालय, सोलापूर जिह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे जगदाळे मामा हॉस्पिटल आदी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणांचे वितरण करण्यात आले.