
सोलापूर जिह्यातील कुर्डू गावातील बेकायदेशीर मुरूम उत्खननाविरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना अडवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्यकर्ते बाबा जगताप यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत बाबा जगताप अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहेत. त्यामुळे आता अजित पवार गटावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ”अजित पवारांना फोन करणारे हेच ते तालुका प्रमुख बाबाराजे जगताप आहेत का? यांच्या हातात काय आहे ? अशा लोकांसाठी अजित पवारानी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावले?”, असा सवाल दमानिया यांनी या व्हिडीओ सोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोलापूर जिह्यातील माढा तालुक्याच्या कुर्डू गावात रस्त्याचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उत्खनन करण्यात येत आहे. या उत्खननाविरुद्ध करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांनी कारवाई केली. या वेळी काही गुंडांनी तहसीलदार, तलाठी यांना लाठय़ाकाठय़ा दाखवत दमबाजी केली. या वेळी टीपर घेऊन गावकरी मोठय़ा संख्येने जमा झाले होते. अंजली कृष्णा यांच्याशी त्यांचा वाद सुरू झाला.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्यकर्ते बाबा जगताप यांनी आपल्या मोबाईलवरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. अजित पवार यांनी गुंडांना झापण्याऐवजी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना दम दिला आणि कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. मात्र अंजली कृष्णा यांनी दाद न देता मला वरिष्ठांना उत्तर द्यावे लागते, असे सांगितल्याने अजित पवारांचा पारा आणखी चढला.