मिंधे-फडणवीस वादात अजित पवार गटाची उडी, कोयनेच्या पाण्यावरून राजकारण रंगले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयना धरणाच्या पाण्यावरून राज्यात सध्या चांगलेच राजकारण रंगले आहे. यामध्ये मिंधे सरकारच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गटाने उडी घेत मिंधे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना बाबर यांनी फक्त 40 आमदारांचे मुख्यमंत्री करून फारच छोटे केले असल्याचा आरोप अजित पवार गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत केला.

कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा असताना सांगली जिह्याच्या वाटय़ाचे पाणी सोडण्याबाबत श्रेयवादाचे राजकारण केले जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. याबाबत फक्त भाजपचे खासदार संजय पाटील यांनी आवाज उठवला. असे सांगून वैभव पाटील म्हणाले, सातारा जिह्याचे पालकमंत्री आणि मिंधे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी हक्काचे पाणी अडविण्याची भूमिका घेतल्यानंतर आमदार अनिल बाबर यांनी पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्याऐवजी राजीनाम्याची भाषा का केली नाही? हा खरा प्रश्न आहे.

सांगली जिह्यावर उपकार करण्याची भाषा देसाई आणि आमदार बाबर यांनी चालवली आहे. खरे वास्तविक पाहाता सांगली जिह्याच्या वाटय़ाचे हक्काचे पाणी असताना हा राजकीय खेळ कशासाठी केला जात आहे? याचा मी निषेध करीत आहे. पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार दरवर्षी पाणी सोडले जाते. मग यावर्षीच पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांची परवानगी का हवी आहे? असा सवाल करून वैभव पाटील मिळाले, केवळ श्रेयवाद घेण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारमधील एक घटक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी या राजकीय श्रेयवादाचा निषेध करीत आहे.

सांगली जिह्याचे हक्काचे पाणी सोडण्याबाबत शंभूराज देसाई यांनी विनाकारण आडमुठी भूमिका घेत राजकारण करून नवा वाद निर्माण केला आहे. या वादात विद्यमान सरकारमधीलच भाजप आणि पाठोपाठ आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. त्यामुळे या वादाला चांगलाच रंग भरला आहे. राज्यातील मिंधे सरकारच्या गटाची दादागिरी या निमित्ताने स्पष्ट होत आहे. त्यामुळे सरकारमधील घटकपक्ष त्यांच्यावर नाराज असून  सरकारच्या या भूमिकेविरोधात जोरदारपणे संघर्ष करण्यासाठी सज्ज झाला असल्याचा प्रत्यय येतो आहे. येणाऱया काळात हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.