
राज्यातील पोलिसांवर गेल्या काही दिवसांपासून हल्ले वाढत असून गेल्या तीन महिन्यात 30 पोलिसांवर हल्ले झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. या वाढत्या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य कमी होत असून ते वाढविण्याची गरज असल्याचे मत मांडतानाच पोलिसांवर हल्ले करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
राज्यातील पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यासदंर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहितीच्या मुद्याद्वारे प्रश्न उपस्थित केला. यावेळी गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांची त्यांनी यादी वाचून दाखवत सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत.
त्वरित दोषारोप पत्र दाखल करण्याची आवश्यकता
पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱयांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणाऱयांवर सरकारने जरब बसविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.




























































