मोदीभक्तीत रंगले अजित पवार, झाला नवा साक्षात्कार; म्हणे ही तर दैवी शक्ती!

राष्ट्रवादीतून फुटून महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवारांचं भाषण चर्चेत आलं आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला भाजप नेते चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. याच बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाविषयी अजित पवार यांनी भाषण केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या खडकवासला मतदारसंघाची बैठक पार पडली. एकेकाळी शरद पवार यांच्याविषयी आदर असल्याचं सांगणाऱ्या अजित पवार यांच्या तोंडी या सभेवेळी मात्र मोदीभक्ताची भाषा दिसून आली. कारण, एखाद्या भाजप नेता-कार्यकर्त्यालाही लाजवेल अशी स्तुती अजित पवार यांनी यावेळी आपल्या भाषणातून केली.

मोदींनी दहा वर्षांत एकही सुट्टी न घेणे इथपासून सुरू करत अमेरिकेने नाकारलेला व्हिसा ते घातलेल्या पायघड्यांपर्यंतचा उल्लेख अजित पवारांनी या भाषणात केला. देशाच्या नेतृत्वाविषयी बोलताना अजित पवार यांनी मोदींना दैवी शक्ती, दैवी देणगी असल्याचंही म्हटल्याने त्यांच्या भाषणाच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.