भाजपसोबत लोकसभेच्या रिंगणात उतरणार का? अजित पवार यांचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता दोन गट झाले आहेत. अजित पवारांचा गट भाजपसोबत महायुतीत आहे. तसेच शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्ष महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर भाजप आणि महायुतीनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्रित लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. अजित पवार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

अजित पवार यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले. अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले, मराठवाड्यात आपल्याला खासदारांची संख्या वाढवायची आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या विचारांच्या आमदारांची संख्या वाढवायची आहे. आधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तुमची काय ताकद आहे ते मला या निवडणुकीत कळेल. कुठल्या कुठल्या विधानसभा मतदारसंघात आपण महायुतीचे उमेदवार देणार आहोत ते लवकरच कळेल. परंतु, आपण जमिनीवर पाय ठेवून लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. नुसतं वरवर करून चालत नाही, असे सांगत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना लोकसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.