
”अरे बापरे, मला तेव्हापासून झोपच येईना हो..हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने आव्हान देतो मी तर विचार करतोय राजकारणच सोडून द्यावे. राजकारणात संन्यास द्यावा. असा 2024 मध्ये अपमान होण्यापेक्षा सन्यास घेतलेला बरा, सांगा त्यांना” असा खोचक टोला अजित पवार यांनी बावनकुळे यांना लगावला आहे.
अजित पवारांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासंदर्भात विधान केले होते. त्या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात विधान केलं. त्यात त्यांनी म्हंटले होते की, ”खरंतर कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती राहूनही कधी राष्ट्रवादी 75च्या वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करणार? बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाहीसारखा कारभार सुरू आहे. माझी एण्ट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे 2024मध्ये जनता ठरवेल”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.


























































