याला पायबंद घातलाच पाहिजे, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवरून अजित पवारांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमातील अश्लील हावभाव व नृत्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असते. अनेक जिल्ह्यांमध्ये तिच्या कार्यक्रमांवर बंदी देखील आहे. आता यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची देखील प्रतिक्रीया समोर आली आहे.

”लावणीचे कार्यक्रम सर्वांना पाहता येतील अशा प्रकारे आयोजित केले पाहिजेत. अशा कार्यक्रमांमधथ्ये अश्लील प्रकार घडले नाही पाहिजे. मी त्याविषयी बोलणार असून गरज पडली तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडणार आहे”, असे अजित पवार म्हणाले.

”आपल्याकडे लावणीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण यातून अश्लील प्रकार होणे हे दुर्दैव आहे. काही जिल्ह्यांमध्ये त्याला बंदी घातली आहे. पण काही जिल्ह्यात अद्याप ते सुरू आहेत. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. आपल्या वडिलधाऱ्यांपासून ही परंपरा सुरू आहे. ती टिकली पाहिजे. त्यामुळे कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.