बाधित रस्ते-पुलांची दुरुस्ती करा; शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा – अजित पवार

बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला, या पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी 7 वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पहाणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भिगवण रस्त्यावरील अमरदीप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हा नदीवरील खंडोबा नगर येथील पूल, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पहाणी केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुढील काळात पुरस्थिती टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण करणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण हटविणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत अतिक्रमणे होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज-अंजणगाव येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसेच बारामती-फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करुन याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना उपमख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या. शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, नगरसेवक सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या