अक्षरांतून अष्टविनायक, चेंबूरच्या आशीष तांबेची अफलातून कलाकृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अजूनही बंद आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना अष्टविनायकाच्या दर्शनाला मुकावे लागत आहे. मात्र, चेंबूरच्या आशीष तांबे या तरुणाने यंदा ‘अक्षरगणेश’ या कलेच्या माध्यमातून भाविकांना घरबसल्या अष्टविनायकाचे दर्शन घडवले आहे. त्याने अष्टविनायकातील प्रत्येक गणपतीच्या नावावरून तिथल्या मूळ मूर्तीची प्रतिकृती साकारली आहे. त्याच्या या कलेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

विविध अक्षरांतून आणि नावांतून गणपती साकारण्याची कला म्हणजे अक्षरगणेश.आशीष तांबे हा तरुण गेल्या आठ वर्षांपासून अक्षरांतून बाप्पाची विविध रूपं साकारतोय. आजवर त्याने आठ हजारांहून अधिक कलाकृती साकारल्या आहेत. आपल्या प्रवासाविषयी आशीष सांगतो, 2013 पासून मी अक्षरगणेश रेखाटायला सुरुवात केली. त्यावेळी अक्षरगणेश साकारणारे अनेक कलाकार होते. पुढे कॅलिग्राफी आणि अक्षरगणेश यांची सांगड घालत मी स्वतःची वेगळी शैली विकसित केली. दरवर्षी गणेशोत्सवात काहीतरी वेगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो. यंदा मी अष्टविनायक सीरिज तयार केली असून तिला गणेशभक्तांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.