अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात जातीयवादाची मुळे घट्ट रोवली जात आहेत की काय अशी शंका येण्याइतपत घटना सध्या महाराष्ट्रात घडत आहेत. नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्याचा जातीय द्वेषातून अक्षय भालेराव या युवा कार्यकर्त्याची निघृण हत्या करण्यात आली. लातूरमध्येही एका मातंग व्यक्तीची सावकाराकडून अवघ्या तीन हजार रुपयांसाठी हत्या करण्यात आली. त्यानंतर मरीन लाइन्स येथेही वसतिगृहात राहणाऱ्या एका बौद्ध तरुणीची संशयास्पदरीत्या हत्या करण्यात आली. या घटनांनी कळवळून उठलेल्या दलित समाजातील संस्था, संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून आज प्रतीक्षानगर येथील शिवाजी चौकात मिंधे-फडणवीस सरकारविरोधात निषेध रॅली आयोजन करून आंबेडकरी जनतेने आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

बहुजनांच्या युवा वर्गावर सातत्याने हल्ला करून जातीय दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या निषेधार्थ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती तसेच सर्व सामाजिक, धार्मिक संघटना एकवटल्या होत्या. त्यांनी मिंधे-फडणवीस सरकारविरोधात निषेध रॅलीचे आयोजन केले होते. रविवारी सकाळी 11 वाजता शिवाजी चौक, सरदार नगर नं.1 येथून ही निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठय़ा प्रमाणात विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. अक्षय भालेरावच्या मारेकऱयांना फाशी झालीच पाहिजे, मिंधे- फडणवीस सरकार हाय-हाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शांततेत निघालेल्या या निषेध रॅलीचा समारोप जीटीबी नगर स्टेशनजवळील स्वर्न कोर बिंद्रा चौक येथे करण्यात आला. या निषेध रॅलीत वत्सलाताई हिरे (अध्यक्षा), विनोद केदारे, विलास (डॉन) कांबळे,  सुरेश बागुल, दिनेश जाधव, दीपक कांबळे, डॉ. प्रबोध गायकवाड, शैला काळे, जयश्री भोसले, प्रतीक कांबळे, दिनेश सोनावणे यांच्यासह आंबडकरी तरुण, तरुणींचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग होता.