अक्षय कारभारी ‘ठाणे महापौर शरीरसौष्ठव श्री’चा मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर शरीरसौष्ठव श्री’ स्पर्धेत अक्षय कारभारी याने चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला, तर खारेगावच्या अपोलो जिमने सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली. महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते व खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख परितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी सभागृहात नेते नरेश म्हस्के,ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती, स्थानिक नगरसेविका नंदिनी विचारे, परिवहन समिती राजेंद्र महाडिक, उपआयुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, माजी नगरसेवक मंदार विचारे, ‘भारत श्री’ विजेते प्रशांत बबन चव्हाण, गिरीश शेटे, आंतरराष्ट्रीय पंच विनायक केतकर, क्रीडा संघटक रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिका खेळाडूंच्या पाठीशी नेहमीच उभी असून पुढील वर्षी ‘महापौर श्री’ पुरस्काराची रक्कम रुपये 50 हजार करण्यात येईल, असे आश्वासन महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी यावेळी दिले.