नवे नाटक लवकरच

>> गणेश आचवल

पंचवीस वर्षांपूर्वी ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आले होते. येत्या ऑक्टोबरमध्ये हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात प्रमुख भूमिका करत आहे अभिनेता अक्षय मुडावदकर.

अक्षय मुळात नाशिकचा आहे. त्याने नाशिकमधून हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण पूर्ण केले. मग हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे त्याने नोकरीदेखील केली. त्याचदरम्यान त्याने मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट ही पदवी मिळवली. एकीकडे नोकरी करत असताना राज्य नाटय़ स्पर्धा कामगार कल्याण केंद्र आणि हौशी रंगभूमीवर अक्षय कार्यरत होता. अक्षय म्हणतो, ‘‘मला अभिनयाची आवड होतीच आणि त्यामुळे आता नोकरी सोडून पूर्णवेळ अभिनयात करीअर करण्याचा निर्णय घ्यायचा होता. माझ्या लग्नाला सात वर्षे झाली होती. अशा वेळी माझे कुटुंबीय आणि माझी पत्नी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी हा निर्णय घेऊ शकलो व 2018 मध्ये मी मुंबईत अभिनयात करीअर करण्यासाठी आलो.’’

मुंबईत आल्यानंतर अक्षयला ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतील विठोजीराजे भोसले ही भूमिका मिळाली. त्यानंतर ‘गांधीहत्या आणि मी’ या व्यावसायिक नाटकात अक्षयने भूमिका केली, पण नंतर कोरोनाचे संकट आले आणि चित्र बदलले. येत्या ऑक्टोबर महिन्यात ‘चूकभूल द्यावी घ्यावी’च्या निमित्ताने अक्षय एका नव्या लुकमध्ये आपल्यासमोर येत आहे. अक्षय म्हणतो, ‘‘मी कित्येक दिवस नवीन नाटकाच्या प्रतीक्षेत होतो. माझा मित्र महेश डोपंफोडे याच्याशी सविस्तर चर्चाही झाली आणि मग ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचे ठरले. त्यानिमित्ताने दिलीप प्रभावळकर यांच्याशी माझी भेट झाली हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणता येईल. एकेकाळी त्यांनी साकारलेली भूमिका मला या नाटकात साकारायला मिळत आहे, याचा मला आनंद आहे.’’मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमांत सातत्याने काम करण्याची अक्षयची इच्छा आहे.