एलन मस्क करणार ट्विटरवर कब्जा, कंपनीला दिली 41 अब्ज डॉलरची ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर कंपनीकडून त्यांना संचालक मंडळात सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली होती, मात्र मस्क यांनीच ही ऑफर नाकारल्याची माहिती ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी दिली होती. आता संचालक मंडळ नको, थेट कंपनीच विकत घेण्याच्या तयारीत मस्क दिसत आहेत. 

अलीकडेच टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती  एलन मस्क यांनी  ट्विटरमध्ये 9.2 टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. आता मस्क यांनी मास्टर प्लॅन आखला असून ते आता ट्विटरची संपूर्ण मालकी मिळवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी कंपनीला 41 अब्ज डॉलरची ऑफर दिली आहे. प्रतिशेअर 54.20 डॉलर मोजण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. मस्क यांच्या ऑफरचे वृत्त आल्यानंतर ट्विटरच्या शेअरमध्ये 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात मस्क यांनी म्हटलेय, मी ट्विटरमध्ये गुंतवणूक केली. कारण मला विश्वास आहे की, त्यात भाषण स्वातंत्र्यासाठी एक जागतिक व्यासपीठ बनण्याची क्षमता आहे, परंतु कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर प्रामुख्याने माझ्या हे लक्षात आले की, सध्याच्या चौकटीत काम केल्यास कंपनीची भरभराट होणे अशक्य आहे. तसेच कंपनी तिच्या सध्याच्या स्वरूपात सामाजिक गरजा पूर्ण करू शकणार नाही किंवा पूर्णही करणार नाही. त्यामुळे कंपनीत मोठे बदल होणे आवश्यक आहे. तसेच ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता असून त्याला वाव देण्याची गरज आहे. माझ्याकडे कंपनीसाठी चांगली ऑफर आहे, मात्र कंपनीने या ऑफरचा विचार न केल्यास मी ट्विटरमधील माझ्या गुंतवणुकीबाबत फेरविचार करेन, असा इशारादेखील मस्क यांनी पत्रातून दिला आहे.