
आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्त पदासाठी आळंदीतील स्थानिक नागरिक, ग्रामस्थ यांनी मुलाखती देऊन देखील तीन विश्वस्तांचे नियुक्ती जाहीर झाल्या. यात एक ही विश्वस्त स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांतून न घेतल्याने विश्वस्तांच्या निवडीत स्थानिक ग्रामस्थांना डावलल्याने या घटनेच्या निषेधार्थ तीर्थक्षेत्र आळंदी मंगळवारी ( दि. ५ ) बंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी आळंदी ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकी नंतर झालेल्या निर्णया प्रमाणे मंगळवारी आळंदी बंद ठेवण्यात येत असल्याचे निवेदन आळंदी पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आले आहे. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) रमेश पाटील यांनी आळंदी ग्रामस्थ यांनी दिलेले निवेदन पोलीस प्रशासनाचे वतीने स्वीकारले.
आळंदी येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेत या संदर्भात सविस्तर चर्चा विचार विनियमासाठी बैठक झाली. यावेळी आळंदी संस्थांन विश्वस्तपदी स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांची निवड व्हावी यासाठी या पूर्वी संबंधित प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला होता. या कडे संबंधित प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांचे अर्जाचा विचार न करता पुढे शिफारसी देण्यात आल्या. आळंदी देवस्थानवर तत्कालीन विश्वस्तांच्या शिफारशी वर नवीन तीन विश्वस्तांची निवड झाली. या शिवाय तत्कालीन विश्वस्तांना अनेक वेळा मुदत वाढ देण्यात आली. या मुदत वाढीच्या निर्णयावर देखील आळंदीत नाराजी आहे. आळंदी ग्रामस्थां तर्फे या निवड प्रक्रियेचा जाहीर निषेध करण्यात आला. संबंधित प्रशासनाने लक्ष न दिल्यास येत्या कार्तिकी यात्रेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आळंदी ग्रामस्थांना तर्फे माजी विरोधी पक्ष गटनेते डी. डी. भोसले पाटील यांनी दिला आहे.






























































