
राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये मद्यविक्रीचं प्रमाण वाढल्याने महसुलात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने यासंबंधीची आकडेवारी तयार केली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दशकांमध्ये न झालेली वार्षिक वाढ दिसून आली आहे.
राज्यात 2021-22 आणि 2022-23 या दोन वर्षांत मद्य विक्रीचं प्रमाण 23 टक्क्यांनी वाढलं आहे. त्यातही वाईन आणि बिअर विक्रीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये अशी वार्षिक वाढ दिसून आली नव्हती. दारूच्या किमती वाढूनही विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणामुळे ही वाढ झाली आहे, असं मत एका महसूल अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे.
नागपूर, छ. संभाजीनगर, कोल्हापूर या तीन शहरांमध्ये मुंबई-ठाणे, पुणे आणि नाशिक या विभागांच्या तुलनेने अधिक विक्री आणि महसूल झाल्याचं आकडेवारीत दिसून आलं आहे. नागपूर येथील महसुलात 42 टक्के, छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे अनुक्रमे 29.7 टक्के आणि 28.5 टक्के इतकी वाढ पाहायला मिळाली आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या शहरांच्या महसुलात यापेक्षा कमी म्हणजे सरासरी 23 टक्के इतकी वाढ पाहायला मिळत आहे. राज्याच्या मद्य विक्री धोरणातील बदलामुळे ही वाढ झाल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

























































