‘डी’ प्रभागातील डोंगरउतारावर राहणाऱयांना ‘खबरदारी’चा इशारा! अतिवृष्टीत दरडी कोसळण्याचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिवृष्टीत दरड कोसळून धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालिकेचा ‘डी’ प्रभाग म्हणजेच ग्रँट रोड परिसरातील डोंगरउतारावर राहणाऱया रहिवाशांना पालिकेने ‘खबरदारी’चा इशारा दिला आहे. दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यास पालिकेशी तातडीने संपर्क करावा. रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी उभे करावे, गॅस विद्युत प्रवाह बंद करावेत, पळापळ करू नये, अफवा पसरवू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास एकत्रित जमण्यासाठी केवळे मठ, मनपा शाळा, बाणगंगा, वाळकेश्वर आणि ताडदेव मनपा शाळा, बने कंपाऊंड, ताडदेव येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

पालिकेच्या ‘डी’ प्रभागात अनेक वस्ती डोंगरउतारावर वसलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पावसाच्या काळात धोका संभवत असल्याने पालिकेने आधीपासूनच खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये नेपियन सी मार्गालगतच्या परिसरातील आशानगर झोपडपट्टी आणि जलदर्शन सोसायटीच्या मागील भाग, फोर्जेट हिल परिसरातील नवयुग सोसायटी आणि चंदूलाल धोबीघाटच्या पाठीमागील भाग, ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील भुलाभाई देसाई मार्गालगत असणाऱया राजाबली लेनचा शेवटचा भाग, फोर्जेट हिल येथील रहिवासी नगर, मणियार इमारतीच्या मागील भाग, बी. एन. वाडिया चाळ व एम. पी. मिल कंपाऊंडच्या (जनता नगर) मागील भाग, बाबुलनाथ परिसरातील लोयलका कंपाऊंड, पथ्थरवाला चाळीच्या मागील भाग, दादीशेठ लेनचा भाग आदी ठिकाणे ही दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱया रहिवाशांनी पालिकेकडून दिल्या जाणाऱया सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

दरड कोसळल्यास अशी घ्या काळजी!

मदतकार्य करीत असताना दरड कोसळलेल्या ढिगाऱयावर उभे राहू नये, जखमी झालेल्या व्यक्तींना त्वरित रुग्णालयात पोहोचवावे. लहान मुले, वृद्ध, अपंग, गरोदर महिला यांची प्राधान्याने काळजी घ्यावी, मदतकार्य करणाऱया यंत्रणांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.  ढिगाऱयाखाली अडकलेल्या व्यक्तींबद्दल माहिती असल्यास ती मदत करणाऱया यंत्रणांना द्यावी. दीर्घकाळ, जोरदार पाऊस पडल्यास सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.