
सामना प्रतिनिधी। अलिबाग
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून रायगड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुरुड तालुक्यात साळव येथे डोंगराचा काही भाग ढासळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. ढिगारा काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मुरुड, रोहा कडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. तर येत्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून निसर्गाचे हे रौद्ररुप पाहूण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे.
डोंगर भागातही मुसळधार पाऊस पडत असल्याने दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुरुड तालुक्यातील साळव येथील डोंगराचा काही भाग रविवारी सकाळी कोसळून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे रोहा, मुरुड, रेवदंडाकडे येणारी जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर घटनास्थळी पोलीस व सार्वजनिक विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून मातीचा ढिगारा जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरू आहे.

























































